Tuesday, August 17, 2010

मराठी आमुची मायबोली ...


… जरी तिची आम्हास परवा नसे. असा मला आजकाल म्हणावसं वाटत आहे. आता तुम्ही विचाराल की का बुआ, असा विशेष काय झालं? नाही म्हणजे प्रत्येक वेळी काहीतरी मनापासून वाटायला काहीतरी घडावच लागतं असं आहे का? असो. तसं आहे खरं.

आता बघा, मी राहतो पुण्यात. माझा जन्म इथलाच. विद्येचं माहेरघर म्हणतात ह्याला. एकेकाळी पुण्यातल्या सर्व शाळांना आपापला माज होता (सौजन्य - अखं आयुष पुण्यात गेलेली माझी आई). एक गर्व, आता तो दुराभिमान कि अभिमान ह्या वादात मी आत्ता जात नाही. पण हा गर्व, कदाचित मी चुकत असीन, आज मला कुठे दिसत नाही. मराठीचं अस्तित्व नाहीसं होत चाललंय असं अगदी आपल्याला घसा खरवडून ओरडता येतं, पण तसं होऊ नये ह्यासाठी आपण काही विशेष केला का आजतागायत?

बर्याच पालकांची सध्या अशी (चुकीची) समजूत होते की मुलाचं शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातूनच झालं पाहिजे, जेणेकरून त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात difficulties येणार नाहीत. इंग्रजी तर सोडा, ह्यांना साधं मराठी (जी त्यांची मातृभाषा आहे) ती सुद्धा नीट बोलता येत नाही! माझ्या आई-बाबा आणि अज्जी-आजोबांच्या कृपेने मी आज, अस्खलित नसेल कदाचित पण, 'मी ना a little late होईन आज, तुम्ही start kara dinner', 'mom मला water देना' असं मराठी तरी बोलत नाही; आणि आजपर्यंत पुण्यात कोणी बोलत देखील नव्हतं! पण परिस्थिती बदलत आहे हे खरं. ज्या जगप्रसिद्ध पुणेरी पाट्यांचा उपरोधिक स्वर बोचरा असला तरी एक आनंद देऊन जातो, त्या खाली येऊन तिथे आता 'May I help you?' अशा प्रकारचे फलक लावले जात आहेत.

काहीजण असं म्हणतील की मराठी अजूनही आहे की, म्हणजे भारतातली चौथी आणि जगातली पंधरावी बोलली जाणारी भाषा आहे मराठी! मी त्यांना असं विचारू इच्छितो की 'बदलता काळ' पाहता, त्याच लोकांना अशी कितपत खात्री देता येईल की हे असंच राहील? माझा दुसरा छोटासा प्रश्न - माझ्या मराठी मित्र परिवारातील किती लोक मराठी वाचण्याचा/लिहिण्याचा प्रयत्न करतात? किती लोकांना F.R.I.E.N.D.S. मधील dialogues जसे तोंडपाठ आहेत, तसेच पु.ल. देशपांडे ह्यांच्या गोष्टींची ओळ-अन-ओळ लक्षात आहे? किती लोक मराठी नाट्यसंगीत, सुगमसंगीत, भावगीत इत्यादी आईकतात? फक्त मराठीच, असं नाही म्हणत आहे मी, पण कधीतरी, थोडंतरी? त्या उलट, मला मागच्या ६ महिन्यात (म्हैसूर आणि आजू-बाजू चे भाग बघून आलो तेव्हा) असं जाणवलं की दक्षिणात्य लोक आपल्या मातृभाषेला जास्ती जपतात. बरेच जण जपतात. प्रश्न असा की आपण का जपू शकत नाही? की आपल्याला जपावस वाटत नाही? की मी speak/write केलेलं मराठी कितपत correct असेल अशी fear वाटते आपल्याला?

मी इथे कुठल्याही राजकीय पक्षाचा जाहीरनामा वाचत नाहीये, किंवा ह्या Blog चा आणि परवा म.न.से नी मल्टीप्लेक्स विरुद्ध केलेल्या आंदोलनाचा काही एक संबंध नाही; हा केवळ एक योगायोग समजावा. तसं म्हणता हा माझाही पहिलाच मराठी blog आहे, म्हणून कदाचित मी पण तेवढाच दोषी असेन. इथे कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता; जे वाटलं ते लिहिलं एवढंच :-) CCD आणि Pizza Hut सारख्या ठिकाणी सरळ मराठी बोला एकदा आणि पहा ते पण, 'Should I suggest you' वरून 'तुम्ही हे का नाही घेऊन बघत' व येतात की नाही ते :-)

विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य टिळक ह्यांसारख्या स्वातंत्र्यवीरांचा, पु. ल. देशपांडे आणि प्र. के. अत्रे ह्यांच्या सारखे उत्तम लेखक आणि वक्त्यांचा, शांता शेळके आणि ग दि मां सारख्या जेष्ठ कवींचा, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि श्रीधर फडके ह्यांच्या सारख्या थोर संगीतकारांचा वारसा टिकवणार कोण?

पण मग ह्या सगळ्यासाठी मी काय करतोय? सध्या तरी मराठी माणसाशी मराठीतच बोलण्याचा मी प्रयत्न करतोय आणि असे blog लिहून मराठी लोकांना मराठीला जपायला प्रेरीत करतोय. लता मंगेशकर, अशा भोसले, श्रीनिवास खळे ह्यांची गाणी अजून एकदा ऐकतोय आणि दुसर्यांना त्याची गोडी लावण्याचा प्रयत्न करतोय... गीत रामायणातल्या रामाकडे आशेने पाहतोय... (आणि योगा-योगा ने अशा भोसले ह्याचं 'स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा' हे गाणं कानावर पडतंय)
_________________
- मराठी मध्ये Blog लिहायची माझी पहिलीच वेळ आहे. तरी व्याक्रणात काही चूक झाली असल्यास माफ करावं. 

1 comment: